US Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारा नियोजित लष्करी हल्ला ऐनवेळी स्थगित केल्याने या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते मोजताब खामेनी यांचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. रझाई यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेवर निशाणा साधत म्हटले की, “इराणचे नागरिक आणि अधिकारी दबावाखाली झुकतील, या चुकीच्या समजुतीत अमेरिका आधी हल्ल्याची अंतिम मुदत जाहीर करते आणि नंतर स्वतःच माघार घेते.” त्यांनी अमेरिकेला इशारा देत सांगितले की, इराणची सशस्त्र सेना आणि नागरिकांची एकजूट अमेरिकेला मागे हटण्यास भाग पाडू शकते. या वक्तव्यातून इराण अमेरिकेच्या दबावापुढे झुकण्यास तयार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (US Iran War) मंगळवारी (१९ मे) ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, नंतर त्यांनी हा हल्ला तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद बिन सलमान, मोहम्मद बिन जायद आणि तमीम बिन हमद अल थानी यांनी त्यांना संदेश पाठवून लष्करी कारवाई टाळण्याचे आवाहन केले होते. US Iran War: ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करताना ट्रम्प यांनी दावा केला की, इराणसोबत सध्या गंभीर वाटाघाटी सुरू असून मोठ्या कराराची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, “इराणने कधीही अण्वस्त्रे बाळगू नयेत, हीच कोणत्याही कराराची सर्वात महत्त्वाची अट असेल.” US Iran War ट्रम्प यांनी संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅनियल केन यांना नियोजित हल्ला पुढे ढकलण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. तरीही, “अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे सज्ज असून वाटाघाटी अपयशी ठरल्यास तातडीने मोठी कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. US Iran War