US-Iran Tension: डोनाल्ड ट्रम्पला मोठा धक्का! ‘इराणविरुद्धचे युद्ध मान्य नाही’ म्हणत अमेरिकेच्या बड्या अधिकाऱ्याचा राजीनामा
US-Iran Tension: जोसेफ केंट यांनी इराणविरुद्धच्या सध्याच्या युद्धनीतीवर तातडीने पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून हे युद्ध सुरू राहिल्यास अमेरिका अधिकच अराजकतेत बुडेल, असा इशाराही दिला आहे. या राजीनाम्यामुळे ट्रम्प प्रशासनावर नव्या दबावाची शक्यता निर्माण झाली असून जागतिक पातळीवर या घडामोडींकडे लक्षपूर्वक नजर ठेवली जात आहे.

US-Iran Tension: इराण-इस्राएल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला मोठा आंतरिक धक्का बसला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे (NCTC) संचालक जोसेफ केंट यांनी इराणविरुद्धच्या युद्धाला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नसताना हे युद्ध इस्राएल आणि अमेरिकेतील प्रभावशाली लॉबीच्या दबावामुळे लादले गेले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राजीनाम्याचे पत्र — केंट काय म्हणाले?
जोसेफ केंट यांनी राजीनाम्याच्या पत्रात लिहिले की, “खूप विचार केल्यानंतर मी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या संचालकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सदसद्विवेकबुद्धीने मी इराणविरुद्धच्या या युद्धाला पाठिंबा देऊ शकत नाही. इराणने अमेरिकेसाठी कोणताही असामान्य धोका निर्माण केला नव्हता. हे युद्ध इस्राएल आणि त्यांच्या शक्तिशाली अमेरिकी लॉबीच्या दबावामुळे सुरू झाले, हे स्पष्ट आहे.”
After much reflection, I have decided to resign from my position as Director of the National Counterterrorism Center, effective today.
I cannot in good conscience support the ongoing war in Iran. Iran posed no imminent threat to our nation, and it is clear that we started this… pic.twitter.com/prtu86DpEr
— Joe Kent (@joekent16jan19) March 17, 2026
‘२००३ च्या इराक युद्धाची पुनरावृत्ती’
केंट यांनी २००३ च्या इराक युद्धाचा दाखला देत सांगितले की इस्राएलने त्याच रणनीतीचा वापर करून अमेरिकेला इराण युद्धात ओढले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘इको चेंबर’चे बळी असल्याचे त्यांनी म्हटले. रणनीतीपूर्वक ट्रम्प यांना हे पटवून दिले गेले की इराण एक तात्काळ धोका आहे आणि त्यावर हल्ला केल्यास विजय सहज मिळेल, पण तसे झाले नाही, असेही केंट यांनी नमूद केले.
ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप
केंट यांनी पत्रात पुढे लिहिले की, जून २०२५ पर्यंत स्वतः ट्रम्प यांनाही कळले होते की मध्य पूर्वेतील हे युद्ध एक सापळा आहे. या युद्धाने अमेरिकेच्या शूर सैनिकांचे बहुमूल्य जीव गेले आणि देशाची संपत्ती रोडावली. तरीही इस्राएली अधिकारी आणि अमेरिकी माध्यमांमधील प्रभावशाली व्यक्तींनी खोट्या माहितीची मोहीम राबवून ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाला कमजोर केले आणि युद्धाला खतपाणी घातले, असा आरोप केंट यांनी केला. “इराक युद्धाने आपल्या देशाला हजारो सर्वोत्तम नागरिकांचा जीव मोजावा लागला. ही चूक पुन्हा होऊ देता कामा नये,” असे केंट यांनी आपल्या पत्राच्या अखेरीस म्हंटले.
युद्धावर पुनर्विचाराचे आवाहन
जोसेफ केंट यांनी इराणविरुद्धच्या सध्याच्या युद्धनीतीवर तातडीने पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून हे युद्ध सुरू राहिल्यास अमेरिका अधिकच अराजकतेत बुडेल, असा इशाराही दिला आहे. या राजीनाम्यामुळे ट्रम्प प्रशासनावर नव्या दबावाची शक्यता निर्माण झाली असून जागतिक पातळीवर या घडामोडींकडे लक्षपूर्वक नजर ठेवली जात आहे.





