US-Iran Peace Talks: 47 वर्षांनंतर अमेरिका-इराण आमने-सामने; 2 तास चर्चा, इराणने केली ‘ही’ मोठी मागणी
US-Iran Peace Talks: इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांना अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. इराणने १९७९ पासून गोठवलेला आपला अब्जावधी डॉलर्सचा निधी परत करण्याची मागणी केली आहे, जी अमेरिकेने फेटाळून लावली आहे. लेबनानमध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा अशी इराणची अट आहे, तर इस्रायलने हिजबुल्लाहसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे.

US-Iran Peace Talks: मध्यपूर्वेतील वाढता तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक ‘सीझफायर’ (युधविराम) वार्ता सुरू झाली आहे. शनिवारी या चर्चेचा पहिला टप्पा दोन तास चालल्यानंतर आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर तब्बल ४७ वर्षांनी दोन्ही देशांचे उच्चस्तरीय नेते अशा प्रकारे आमने-सामने बसले आहेत.
प्रमुख नेत्यांचे नेतृत्व –
या अतिसंवेदनशील बैठकीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस करत आहेत, तर इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबाफ करत आहेत. या चर्चेत सुरक्षा, राजकारण, सैन्य, अर्थव्यवस्था आणि कायदा या क्षेत्रातील तज्ज्ञही सहभागी झाले आहेत.
इराणची आक्रमक भूमिका: ‘लेबनानवरील हल्ले थांबवा’ –
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराणने स्पष्ट भूमिका मांडली आहे. इस्रायलचे लेबनानवर सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबवावेत, अशी मागणी इराणने केली आहे. इराणचे म्हणणे आहे की, जर ही चर्चा अपयशी ठरली तर त्याला केवळ इस्रायल जबाबदार नसेल, तर अमेरिकेलाही त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. लेबनान आणि इस्रायलमध्ये १४ एप्रिल रोजी अमेरिकेत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हृदयद्रावक फोटोसह गालिबाफ यांचे आगमन –
इराणी संसदेचे सभापती गालिबाफ यांनी विमानातून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रक्ताने माखलेले मुलांचे दप्तर, बूट आणि फोटो दिसत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी इराणच्या मिनाब शहरातील एका प्राथमिक शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६८ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची आठवण करून देत इराणने जागतिक स्तरावर आपली बाजू मांडली आहे.
सुरक्षेचा कडक वेढा: सेरेना हॉटेल बनले केंद्र –
इस्लामाबादमधील अतिसुरक्षित ‘सेरेना हॉटेल’मध्ये ही गुप्त बैठक पार पडत आहे. जेडी वेंस यांच्या विमानाला पाकिस्तानच्या ५ ‘F-16’ फायटर जेट्सनी एस्कॉर्ट केले. पाकिस्तानी लष्करी प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. विशेष म्हणजे, इराणी प्रतिनिधींना भेटताना ते लष्करी गणवेशात होते, तर अमेरिकन प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सिव्हिल सूट परिधान केला होता.
जागतिक परिणाम आणि अर्थव्यवस्था –
पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी म्हटले आहे की, ही चर्चा केवळ दोन देशांपुरती मर्यादित नसून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था यावर अवलंबून आहे. विशेषतः होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सुरक्षित राहणे गरजेचे आहे, अन्यथा युरोपमध्ये जेट इंधनाची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते.
चर्चेतील प्रमुख अडथळे –
इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांना अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. इराणने १९७९ पासून गोठवलेला आपला अब्जावधी डॉलर्सचा निधी परत करण्याची मागणी केली आहे, जी अमेरिकेने फेटाळून लावली आहे. लेबनानमध्ये तात्काळ युद्धविराम व्हावा अशी इराणची अट आहे, तर इस्रायलने हिजबुल्लाहसोबत चर्चा करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, चीनचे शिष्टमंडळही या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता असून, कोणताही करार झाल्यास चीन त्यात ‘गॅरेंटर’ (हमीदार) म्हणून भूमिका बजावू शकतो. ही चर्चा उद्याही सुरू राहण्याची शक्यता आहे.





