अमेरिकेची चीनवर आयात शुल्कात 100 टक्क्यांची वाढ; भारतीय निर्यातीसाठी नवीन संधींचे दार खुले

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरोधात आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतून भारतीय वस्तूंना अधिक मागणी वाढेल अशी आशा फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन या संघटनेने व्यक्त केली आहे.
या संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्हन यांनी सांगितले की, अमेरिकेने जर चीनवर भारतापेक्षा जास्त आयात शुल्क लावले तर अर्थातच अमेरिकेला जाणार्या चिनी वस्तूपेक्षा भारतीय वस्तू अधिक स्वस्त होतील. भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात अमेरिकेला 86 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली होती.
ऑगस्ट महिन्यापासून भारताने अमेरिकन वस्तूवर 50% आयात शुल्क लावल्यामुळे भारतीय निर्यात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अशातच अमेरिका आता चीनविरोधात भारतापेक्षा जास्त आयात शुल्क लावणार असल्यामुळे नव्या परिस्थितीत भारताची निर्यात वाढणस वाव आहे.
अमेरिकेने चीनविरोधात अगोदर 30% आयात शुल्क लावले होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नोव्हेंबरपासून चिनी वस्तूवर आणखी शंभर टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. भारतावरील 50% आयात शुल्कापेक्षा चीनवरील 130 टक्के आयात शुल्क जास्त आहे.
भारत आणि चीनमध्ये अमेरिकेला पाठविण्यासाठी कपडे तयार केले जातात. आता चीनमधून पाठविले जाणारे कपडे भारतापेक्षा महाग होणार आहेत. अशीच परिस्थिती खेळण्याबाबतही आहे. चीनच्या निर्यातीवर झालेला परिणाम भारतासाठी लाभदायक ठरू शकतो असे या क्षेत्रातील निर्यातदारांनी सांगितले.
जागतिक व्यापारावर संशोधन करणार्या जीटीआरआय संस्थेने नवा घडामोडीनंतर सांगितले की, जागतिक बाजारात चीनच्या नव्या भूमिकेमुळे इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, चामड्याच्या वस्तू, सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेसाठी लागणारी उपकरणे महाग होण्याची शक्यता आहे. भारत -अमेरिका एकूण व्यापार 2024- 25 मध्ये 131.84 अब्ज डॉलरचा होत. त्यात भारताच्या 86 अब्ज डॉलरच्या निर्यातीचा समावेश होता.
चीनने रोखली निर्यात –
भारतापेक्षा चीनवर कमी आयात शुल्क असूनही चीनने अमेरिकेला रेअर अर्थ मेटलचा पुरवठा कमी केला आहे. यामुळे अमेरिकेतील संरक्षण क्षेत्र, इलेक्ट्रिक, वाहन क्षेत्र आणि हरित ऊर्जा क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी चीनविरोधात शंभर टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.





