अमेरिकी आरोग्य संस्थेकडून भारताला मदत जाहीर
Updated On:

नवी दिल्ली -अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) भारताला 36 लाख डॉलर्सची मदत जाहीर केली. भारताच्या करोनाविरोधी लढ्याला त्यामुळे आर्थिक हातभार लाभेल. सीडीसी ही अमेरिकेची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था आहे. ती संस्था अमेरिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कार्य करते.
करोना फैलाव रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असणाऱ्या प्रतिबंधात्मक आणि प्रतिसाद कार्यासाठी सीडीसीची मदत पूरक ठरेल. करोनाच्या निदानात सुधारणा, चाचण्यांसाठी प्रयोगशाळांच्या क्षमतेत वाढ यासाठी ती मदत उपयोगी ठरणार आहे. सीडीसीकडून भारताला तांत्रिक सहकार्यही उपलब्ध केले जाणार आहे.
करोनाविरोधी लढ्यात एकमेकांना सहकार्य करण्याची ग्वाही भारत आणि अमेरिकेने दिली आहे. त्याअंतर्गत अमेरिकेने याआधीही भारताला आर्थिक मदत देऊ केली आहे.





