शिकागो – कमला हॅरिस यांच्या रुपाने अमेरिकेला अधिक चांगल्या अध्यक्ष मिळणार आहेत. आणखीन चार वर्षे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली बढाया मारणे, अडखळत बोलणे आणि गोंधळाची स्थिती अमेरिकेतील जनतेला नको आहे, अशा शब्दात माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा दर्शवला. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बोलताना ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळातील माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कार्याचेही कौतुक केले. बायडेन यांनी कमला हॅरिस यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल ओबामा यांनी बायडेन यांचे कौतुक केले. अध्यक्ष म्हणून आणि मित्र म्हणूनही आपल्याला बायडेन यांचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका नवीन अध्यायासाठी तयार आहे. ट्रम्प यांच्याविरोधातली निवडणूक चुरशीची असणार आहे. अजूनही अमेरिकेतील बऱ्याच लोकांना सरकार काही करू शकते, यावर विश्वास वाटत नाही. त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे, तरच लोकशाही वाचवली जाऊ शकेल, असे ओबामा म्हणाले. ट्रम्प यांनी द्विपक्षीय सीमा करार रद्द करवला आणि महिलांचा हक्क हिरावून घेतला यामुळे अमेरिकेतील नागरिक नाराज झाले आहेत, असेही ओबामा म्हणाले. नऊ वर्षांपुर्वी अध्यक्ष झाले, तेंव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांना रडण्याची सवय लागली आहे. ती अजूनही कायम आहे. आता त्यांना कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत होण्याची भीती वाटते आहे, असे ओबामा म्हणाले. मिशेल यांच्याकडूनही हॅरिस यांची पाठराखण कमला हॅरिस यांच्या रुपाने अमेरिकेला नवीन आशा मिळते आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेली आतापर्यंतची सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती अशा शब्दात माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी देखील कमला हॅरिस यांचे कौतुक केले. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कमला हॅरिस देशाला नवी दिशा देतील, असे मिशेल म्हणाल्या.