ट्रम्प आक्रमक भूमिकेत, बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्यास सुरूवात

US Deports Indian Migrants : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून देशात बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी देशातील बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यातच आता अमेरिकेने बेकायदेशीररित्या देशात राहत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. या प्रवाशांना घेऊन विमानाने भारताच्या दिशेने उड्डाण देखील घेतले आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकन हवाई दलाचे सी-17 वाहतूक विमान बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. या विमानाला भारतात पोहोचण्यासाठी किमान 24 तास लागू शकतात. या विमानात नक्की किती प्रवासी आहेत, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचे पाऊल उचलण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प त्यांचा इमिग्रेशन अजेंडा राबवण्यासाठी लष्कराची मदत घेत आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी लावण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला होता. याशिवाय, सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले होते. या बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्करी विमानांचाही वापर केला जात आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरित्या राहत असलेल्यांना परत पाठवणार असल्याचे वारंवार म्हटले आहे. इमिग्रेशन एंड कस्टम्स इन्फोर्समेंटने अशा 15 लाख प्रवाशांची यादी देखील तयार केली होती. यामध्ये 18 हजार भारतीयांचा समावेश आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर 11 दिवसातच 25 हजार बेकायदेशीरपणे देशात राहत असलेल्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये जवळपास 1700 भारतीयांचा देखील समावेश होता. आता अमेरिकेने कठोर पावले उचलत भारतीयांना परत पाठवण्यास सुरुवात केली आहे.





