देर अल-बलाह (गाझा पट्टा) : ट्रम्प प्रशासनाप्रती सद्भावना म्हणून हमासने सोमवारी गाझा पट्टीत १९ महिन्यांहून अधिक काळ ओलिस ठेवलेल्या एका इस्रायली-अमेरिकन सैनिकाची सुटका केली. एडन अलेक्झांडर याला रेड क्रॉस आणि नंतर इस्रायली सैन्याच्या स्वाधीन करण्यात आले, असे इस्रायली सैन्याने सांगितले. अलेक्झांडर असे नाव लिहीलेला शर्ट त्याने घातला होता. तेल अविवमध्ये त्यांचे कुटुंबीय त्यांना नेण्यासाठी जमले होते. अलेक्झांडर यांची सुटका झाल्याचे जाहीर झाल्यावर त्यांची आजी, वरदा बेन बारुच यांना विशेष आनंद झाला. तेल अविवच्या होस्टेज स्क्वेअरमध्ये शेकडो लोकांनी जल्लोष केला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने सीमापार केलेल्या हल्ल्यात अलेक्झांडरला दक्षिण इस्रायलमधील त्याच्या लष्करी तळावरून पळवून नेण्यात आले तेव्हा तो १९ वर्षांचा होता. या हल्ल्यामुळे गाझामध्ये युद्ध सुरू झाले होते. मार्चमध्ये इस्रायलने हमाससोबत आठ आठवड्यांचा युद्धविराम मोडल्यानंतर एखाद्या ओलिसाची सुटका होण्याची ही पहिलीच घटना होती. या सुटकेमुळे हमास आणि इस्रायल दरम्यान नव्याने युद्धबंदीच्या चर्चेचे वातावरण निर्माण होऊ शकते. इस्रायलने आपले आक्रमण तीव्र केले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यात गाझाचा संपूर्ण प्रदेश ताब्यात घेऊन तेथील लोकसंख्येपैकी बहुतेकांना विस्थापित करण्याचा समावेश आहे. युद्धबंदी संपण्याच्या काही दिवस आधी, इस्रायलने पॅलेस्टिनी भूप्रदेशात प्रवेश आणि सर्व मदतीचे मार्ग रोखले त्यामुळे मानवीय संकट आणखी वाढले आणि नाकेबंदी उठवली नाही तर दुष्काळ पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.