आता चीनने अमेरिकेला दिला धक्का ! अमेरिकन उत्पादनांवर लादला कर ; गुगलवर घेतला कठोर निर्णय

US-China Tariff War। आता जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ वॉर सुरू झाल्याचं दिसून येतंय. एकीकडे, शनिवारी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लादले. या अमेरिकेच्या निर्णयावर आता चीननेही मोठा निर्णय घेतला आहे. चीनने अमेरिकन उत्पादनांवर नवीन शुल्क जाहीर करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
चीनने अमेरिकन उत्पादनांवर लादलेला कर सोमवारपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या शुल्काला प्रत्युत्तर म्हणून चीनने नवीन शुल्क जाहीर केले असल्याचे म्हटले जात आहे.
आज चीनच्या अर्थ मंत्रालयाने अमेरिकन उत्पादनांवर १० ते १५ टक्के कर लादण्याच्या निर्णयाची माहिती दिली. बीजिंगच्या या शुल्कामुळे अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या मोठ्या कार, पिकअप ट्रक, कच्चे तेल, एलएनजी आणि कृषी उपकरणांच्या आयातीवर परिणाम होईल.
चीनने अमेरिकेतून आयात केलेल्या कोळसा, एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) वर १५ टक्के आणि कच्चे तेल, कृषी उपकरणे, पिकअप ट्रक, उच्च उत्सर्जन करणाऱ्या वाहनांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, चीनने अमेरिकेला निर्यात होणाऱ्या काही प्रमुख खनिजांवरही नियंत्रण लादले आहे.
गुगलबाबत ड्रॅगनची कडक भूमिका US-China Tariff War।
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकन टेक जायंट कंपनी गुगलवरही कडक कारवाई केली आहे. चीनने घोषणा केली आहे की ते अँटीट्रस्ट कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून गुगलची चौकशी करेल. चीनच्या स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशनने म्हटले आहे की ते गुगलविरुद्ध त्यांच्या मक्तेदारीविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशी सुरू करत आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन दिले US-China Tariff War।
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने आज एका निवेदनात पुष्टी केली की अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ उपायांना तोंड देण्यासाठी चीनने WTO विवाद निवारण यंत्रणा आणली आहे.





