Donald Trump : टिकटॉकबाबत अमेरिका-चीनमध्ये समझोता; डोनाल्ड ट्रम्प यांचं सूचक विधान

वॉशिंग्टन : टिकटॉक या सोशल मीडियावरील व्हिडीओ ऍपबाबत अमेरिका आणि चीनमध्ये समझोता झाल्याचे समजते आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्द्यांवरील चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. अमेरिकेतील युवकांना आनंद होणार आहे. काही कंपन्यांबाबत अमेरिका आणि चीनमध्ये समझोता झाला आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेत टिकटॉकचा वापर सुरू ठेवण्याच्या अनुषंगाने हा समझोता असल्याचे समजते आहे. टिकटॉक या चिनी ऍपवर अमेरिकेच्या मालकीसंदर्भातल्या अटी चीनने मान्य करण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. ही मुदत संपण्याच्या जवळ आली असतानाच हा समझोता झाला असल्याची लक्षणे दिसत आहेत.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये कंपनीचे नाव आणि समझोत्याचा कोणत्याही तपशीलाचा उल्लेख केला नाही. मात्र या कंपन्यांबाबत आपण येत्या शुक्रवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग याच्याशी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि चीन दरम्यान युरोपात झालेली बैठक खूपच चांगली झाली. थोड्याच वेळात ही बैठक समाप्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची बैठक स्पेनमध्ये सुरू आहे.
अमेरिकेत टिकटॉकचा वापर करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. टिकटॉकची मूळ मालकी बाइटडान्स या चिनी कंपनीकडे आहे. टिकटॉकची मालकी बाइटडान्सकडून अमेरिकेच्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे.





