वॉशिंग्टन, दि. 26 – अमेरिकेने आपल्या नागरीकांना पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात प्रवेश करण्याबाबत नवीन सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नागरीकांना पाकिस्तान आणि बांगलादेश या देशात प्रवेश करण्याच्या प्रस्तावाचा फेर विचार करावा आणि अफगाणिस्तानात जाऊ नये अशी नवी सुचना अमेरिकेच्या प्रशासनाने आपल्या नागरीकांना जारी केली आहे.
कोविड, दहशतवाद आणि वांशिक हिंसाचारामुळे पाकिस्तानात जाणे धोकादायक आहे. त्यातही त्या देशाच्या बलुस्तिान आणि खैबर पख्तुनवा प्रांतात जाणे अधिक धोकादायक आहे असे अमेरिकेने आपल्या नागरीकांना सांगितले आहे. त्या देशातील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या परिसरात जाणेही तेथील संघर्षाच्या स्थितीमुळे धोकादायक बनले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
बांगलादेशातही अपहरण, दहशतवाद आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने तेथे जाणेही धोकादायक असल्याचे अमेरिकेचे सांगणे आहे. बांगलादेशातील खग्राचारी, रंगामती आणि बंदरबन या डोंगरी भागात जाणे अधिक संकटात टाकणारे ठरणार असल्याचेही त्यांनी आपल्या नागरीकांना कळवून त्यांना त्या ठिकाणच्या प्रवासाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानात तर जाऊच नका असेही अमेरिकेने आपल्या नागरीकांना सांगितले आहे.