वेस्ट पाम बीच (अमेरिका) : कॅरेबियन समुद्रात अमेरिकेच्या लष्कराने पुन्हा एकदा ड्रग तस्करांच्या एका बोटीवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी शनिवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये या कारवाईची माहिती दिली. कारवाई करण्यात आलेली बोट अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या गटाची होती, असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. मात्र या गटाचे नाव हेगसेथ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेले नाही. या हल्ल्यामध्ये ३ जण ठार झाले, असे हेगसेथ यांनी म्हटले आहे. काल हवाई कारवाई झालेली एव्हरी अदर ही बोट अवैधपणे अमली पदार्थांची वाहतूक करत असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. ड्रग तस्कर नेहमी ज्या छुप्या सागरी मार्गाचा वापर करत असतात, त्याच मार्गाने ही बोट अमेरिकेच्या दिशेने चालली होती. या बोटीवर ड्रग्ज होते, असे हेगसेथ यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कॅरेबियन समुद्रात किंवा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात अमेरिकेकडून अशाप्रकारे १५ बोटींवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. सप्टंबर महिन्याच्या प्रारंभीच्या काळापासून अमेरिकेने ड्रग तस्कांच्या बोटींवर हवाई हल्ले करायला सुरुवात केली आहे. अशा हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ६४ जण ठार झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्या ड्रग तस्करांच्या बोटींवरच्या अशा कारवाईचे समर्थन केले आहे. ड्रग तस्करांविरोधात अमेरिकेचा सशस्त्र लढा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दिनांक ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कवर झालेल्या दहवादी हल्ल्यानंतर तत्कालिन बुश प्रशासनाने ज्याप्रमाणे दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले होते, त्याच प्रमाणे हा ही कारवाई असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.