‘त्या’ फोटो शूटवरून उर्वशी ट्रोल! अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली “लोकांना पचवता येत नाही..” काय आहे प्रकरण?

Urvashi Rautela : नुकत्याच ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. यंदाच्या चित्रपट महोत्सवाला बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील हजेरी लावली होती. तिच्या रेड कार्पेटवरच्या ग्लॅमरस लूकची बरीच चर्चा झाली. तिचे परिधान केलेल्या विविध ड्रेसवरील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता उर्वशीने एका पाइव्ह स्टार हॅाटेलच्या पायऱ्यांवर केलल्या फोटो शूटवर तिला ट्रोल करण्यात येत आहे. यावर आता उर्वशीने खुलासा करत इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे प्रकरण?
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्वशी एका हॉटेलच्या पायऱ्यांवर पोज देताना फोटोशूट करताना दिसत आहे. यानंतर, ट्रोलर्सकडून दावा करण्यात आला होता की तिने संबंधित पाइव्ह स्टार हॅाटेलमध्ये फोटो शूट करून रस्ता अडवला होता. तसेच एका लोकप्रिय फॅशन वॉचडॉग पेजनेही तिच्यावर निशाणा साधला आणि तिला ‘जिना ब्लॉकर’ असे संबोधले आहे. यावर आता उर्वशीने मौन सोडले असून, फोटोशूट करण्यासाठी परवानगी मिळाली असल्याचा खुलासा तिने केला आहे.
काय म्हणाली उर्वशी ?
उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तिने फेटाळून लावले आहेत. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना तिने लिहिले की, फोटोशूट पूर्णपणे नियमांनुसार झाले होते आणि त्यासाठी आयोजन समितीची पूर्वपरवानगी घेतली होती. उर्वशीने ट्रोलर्सचे नाव न घेता त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. ‘मुखवटा घातलेले अकाउंट्स’ कोणत्याही माहितीशिवाय खोटे पसरवतात आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देशाचे नाव उंचावणाऱ्यांना लक्ष्य करण्याचा एक मार्ग आहे, असल्याचे सडेतोड उत्तर तिने पोस्टमधून आरोप करणाऱ्या ट्रोलर्संना दिले आहे.
काही लोकांना हे पचवता येत नाही
तिने पुढे लिहिले की, काही लोकांना हे पचवता येत नाही की एका भारतीय अभिनेत्रीला जागतिक स्तरावर इतके कौतुक मिळत आहे. अशा ट्रोलर्सना उर्वशीने ब्लॉक केले असून तिच्या चाहत्यांनाही तिने अशा अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन केले आहे. तिचा आत्मविश्वास आणि मेहनत कोणीही कमी करू शकत नाही, असेही तिने तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. तिने नेहमीच भारताची संस्कृती आणि ओळख अभिमानाने प्रदर्शित केली आहे आणि भविष्यातही ती असेच करत राहील, असेही तिने म्हटले आहे.





