पुणे | उरूळी देवाची- फुरसुंगी नवीन नगरपरिषद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिका हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे अखेर महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली असून, या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने बुधवारी काढले आहेत. या गावांमधील कचरा डेपो मात्र महापालिकेच्या हद्दीतच ठेवण्यात आला आहे.
ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेकडून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात करवसुली करण्यात आली. मात्र, कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत होती.
त्यानंतर माजी आमदार विजय शिवतारे यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरपरिषदेची मागणी केली होती. त्याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळून त्याची नगरपरिषद करण्याची घोषणा केली होती.
मात्र, त्यानंतर मागील दीड वर्षांपासून याबाबतची प्रक्रिया सुरू होती. शासनाने याबाबत हरकती आणि सूचनाही मागविल्या होत्या.
त्यानंतर अखेर ही दोन गावे महापालिका हद्दीतून वगळत शासनाने या दोन्ही गावांना गणेशोत्सवाची भेट दिली आहे. नगरपरिषदेची रचना होईपर्यंत या गावांची जबाबदारी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे असणार आहे.
मात्र, या गावांसाठी अनुदान कोण देणार, त्याचे हस्तांतरण कसे होणार, गावे वगळल्यानंतर यापूर्वी या गावांमधून महापालिकेत आलेल्या कर्मचाऱ्यांचे काय होणार, याबाबत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना महापालिकेस प्राप्त झालेल्या नाहीत.
अशी असेल नगरपरिषदेची हद्द
– पूर्वेला : लोणी काळभोर गावाची शीव
– पश्चिम : औताडेवाडी, वडाचीवाडी, हडपसर गावाची शीव
– दक्षिण : वडकी गावाची शीव, शेळकरवाडी शीव
– उत्तर : हडपसर गावची शीव, शेवाळेवाडी शीव, लोणीकाळभोर गावाची शीव
महापालिकेची हद्दही बदलणार
शासनाने ही दोन्ही गावे वगळल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या हद्दीवरही होणार आहे. या दोन्ही गावांमध्ये उरूळी गावाची लोकसंख्या सर्वाधिक होती, तर गावांमध्ये कचरा डेपो होता. शासनाने कचरा डेपो महापालिकेतच ठेवत भविष्यातील वादावर तोडगा काढला आहे.
ही गावे वगळण्यात आल्याने महापालिकेची पूर्वेकडील सीमा बदलली असून, नव्या निर्णयामुळे पूर्वेकडील हद्द आता मांजरी बु, शेवाळेवाडी, हडपसर या गावांची महसूली हद्द व फुरसुंगी गावातील कचरा डेपोची हद्द असणार आहे. दक्षिण पूर्वेची हद्द आता महमंदवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या महसुली गावांची हद्द व उरूळी देवाची कचरा डेपोची हद्द असणार आहे.

