Ursula von der Leyen : युरोपच्या सक्षमीकरणासाठी 800 अब्ज युरोचा प्लॅन; उर्सुला वोन डेर वोन लेयन यांची घोषणा

ब्रुसेल्स : युरोपीय संघाने आपल्या संरक्षण खर्चामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपच्या सशस्त्रीकरणासाठी ८०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेचा आराखडा युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन यांनी मांडला आहे. अल्प मुदतीच्या तात्काळ गरजेसाठी आणि युक्रेनच्या मदतीसाठी देखील हे सक्षमीकरण आवश्यक आहे. तसेच दीर्घकालावधीसाठी युरोपच्या स्वतःच्या संरक्षणाच्या जास्तीच्या जबाबदारीच्या दृष्टीनेही हे आवश्यक असल्याचेत्यांनी म्हटले आहे.
पुन्हा सशस्त्र होण्याच्या काळामध्ये सध्या युरोप आहे. त्यासाठीच संरक्षणावरचा खर्च युरोपला वाढवावा लागणार आहे. असे त्यांनी जोर देऊन म्हटले आहे. युरोपच्या संरक्षणासाठी तब्बल ८४१ अब्ज डॉलरच्या आराखड्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातली चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिकेने युक्रेनची सर्व मदत स्थगित केली आहे. युक्रेनच्या निमित्ताने युरोपच्या संरक्षणाचाही मुद्दा ऐरणीवर आल्याने लेयन यांनी हा पाच कलमी आराखडा मांडला आहे.
या पाच कलमी आराखड्यानुसार युरोपीय संघाच्या सर्व सदस्य देशांना संरक्षण खर्चात वाढ करावी लागणार आहे. संरक्षण खर्च न वाढवण्याचे बंधन पुर्वी सदस्य देशांना घालण्यात आले होते. ही तरतूद आता रद्द केली जाणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून युरोपीय आयोग संरक्षणासाठी सदस्य सरकारांना १५० अब्ज युरो कर्ज देखील देणार आहे. गेल्या आठवड्यात लंडनमध्ये घाईघाईने बोलावण्यात आलेल्या युक्रेन सुरक्षा परिषदेनंतर युरोपीय आयोगाने संरक्षण खर्चाबाबतचा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.





