वायू प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची पाऊले; राज्यस्तरीय ‘टास्क फोर्स’ स्थापन

पुणे – दिल्लीतील वायूप्रदूषणाचा विषय जेवढा गंभीर झाला आहे, तेवढाच तो महाराष्ट्रातही गंभीर होऊ पाहात आहे. त्यातून पुण्या-मुंबईत वायुप्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. हे प्रदूषण कमी करणे आणि आरोग्याबाबत अधिक समस्या उद्भवू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने स्पेशल “टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही राज्य आरोग्य विभागाच्या आयुक्तांना देण्यात आले आहेत.
राज्यात मुख्यत्त्वे पुणे आणि मुंबई हे वायूप्रदूषणात धोकादायक पातळीच्या वर गेले आहेत. या शहरांचा वायू गुणवत्ता निर्देशांक हा 100 च्याही पुढे गेला आहे जो प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी असला पाहिजे. या परिस्थितीमुळे श्वसनविकार असलेल्या नागरिकांना त्रास होत असून, खोकला, दमा, अन्य श्वसनविकार अशी लक्षणे दिसून येत आहे.
हा परिणाम गंभीर असून, यावर दीर्घकाळ औषधे घ्यावी लागत आहेत. याचा गंभीर परिणाम हा वृद्ध, लहानमुले आणि सहव्याधी असलेल्यांवरही जास्त होत आहे. याशिवाय प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींवरही याचे गंभीर परिणाम दिसून आले आहेत.
समितीत कोणाचा समावेश
टास्क फोर्समध्ये बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील फुप्फुसरोग विभागाचे प्रमुख, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, मुंबईतील पर्यावरण अथवा वैद्यकीय तज्ज्ञ, साथरोग विभागातील अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
वायूप्रदूषण वाढल्यामुळे राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना आठवडाभरात करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या प्रतिनिधींकडून वायु प्रदूषण कमी करणे आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक काय काळजी घ्यायला हवी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील.” – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, साथरोग विभाग, पुणे





