UPSC Result 2023: महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे, अर्चित डोंगरे, प्रियंका मोहिते UPSC मध्ये यशस्वी; रँक जाणून घ्या

UPSC CSE Result 2023: युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२३ चा निकाल जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये लखनऊचा आदित्य श्रीवास्तवने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनिमेष प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे. या परीक्षांमध्ये एकूण 180 उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) साठी निवड झाली आहे. (UPSC Result 2023: Aniket Hirde, Archit Dongre, Priyanka Mohite from Maharashtra succeed in UPSC; Know the rank)
त्याच वेळी, 200 उमेदवारांची भारतीय पोलीस सेवेसाठी म्हणजेच आयपीएससाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय विदेश सेवेसाठी अर्थात आयएफएससाठी 37 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या परीक्षांद्वारे केंद्र सरकारच्या विविध अ श्रेणीच्या पदांवर 413 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ग्रेड बी पदासाठी 113 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम –
यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. पहिल्या 100 जणांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे याचे नाव असून त्याची रँक 81 आहे. प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक 595 आला आहे, हिंगोलीच्या अंकेत जाधवची 395 वी रॅंक तर अर्चित डोंगरे याचा रँक 153 आहे. दरम्यान, 2023 मध्ये यूपीएससीच्या 1143 पदांसाठी जाहीरात निघाली होती.
मुलाखतीत एकूण 2,800 हून अधिक उमेदवार उपस्थित –
युपीएससीने सांगितले की यावर्षी या परीक्षेची मुलाखत 9 एप्रिल 2024 रोजी संपली. मुलाखती 4 जानेवारीला सुरू झाल्या आणि 9 एप्रिलपर्यंत चालल्या. एकूण 2800 पेक्षा जास्त उमेदवार वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या मुलाखतींमध्ये उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर, सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवडलेल्या उमेदवारांची नावे आणि रोल नंबर त्यांच्या श्रेणीनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा गेल्या वर्षी 28 मे रोजी झाली होती. प्रिलिम्समध्ये यशस्वी झालेले उमेदवार पुढील फेरीत परीक्षेला बसले. नंतर 15 ते 24 सप्टेंबर 2023 या काळात दोन शिफ्टमध्ये परीक्षांची दुसरी फेरी घेण्यात आली. यूपीएससीने सांगितले की एकूण 1016 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि केंद्र सरकारच्या विविध सेवांसाठी शिफारस केली गेली आहे. यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे.





