UPSC News : उमेदवारांच्या प्रयत्नांची वर्षनिहाय नोंद ठेवावी; केंद्रीय माहिती आयोगाचा युपीएससीला सल्ला
केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC News) एक सल्ला दिला आहे.

UPSC News : केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC News) एक सल्ला दिला आहे. त्यानुसार, उमेदवारांनी नागरी सेवा परीक्षांमध्ये किती वेळा प्रयत्न केले आहेत, याची पद्धतशीर आणि वर्षनिहाय नोंद ठेवणे शक्य आहे का, याचा विचार करावा, असे म्हटले आहे. आयोगाच्या मते, अशा प्रकारची माहिती प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि जनहितार्थ अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
एका उमेदवाराने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना आयोगाने (UPSC News) हा सल्ला दिला. संबंधित उमेदवाराने यूपीएससीद्वारे आयोजित मागील नागरी सेवा परीक्षांमध्ये त्याने किती वेळा प्रयत्न केले आहेत, याची माहिती मागितली होती. यूपीएससीने ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर, संबंधित उमेदवाराने माहितीचा अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत आयोगाकडे धाव घेतली होती.
माहिती आयुक्त जया वर्मा सिन्हा यांनी आपल्या आदेशात म्हटले की, जरी आरटीआय कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांवर त्यांच्या नोंदींमध्ये नसलेली माहिती नव्याने तयार करण्याची किंवा संकलित करण्याची सक्ती नसली, तरी अशा प्रकारची माहिती जतन करणे उपयुक्त ठरू शकते.
उमेदवार अनेकदा पात्रता निश्चित करण्यासाठी, नोंदींची पडताळणी करण्यासाठी किंवा परीक्षेतील प्रयत्नांशी संबंधित वाद सोडवण्यासाठी अशा माहितीची मागणी करत असतात. यूपीएससीने योग्य रेकॉर्ड-मॅनेजमेंट आणि डेटा-रिटेन्शन (माहिती जतन) प्रणालींचा अवलंब करण्याबाबत विचार करावा, जेणेकरून अशी माहिती जतन केल्यास ती कार्यक्षमतेने मिळवता येईल आणि आरटीआय कायद्याच्या तरतुदींनुसार ती उघड करता येईल, असे सीआयसीने म्हटले.
यापूर्वी, यूपीएससीने (UPSC News) संबंधित अर्जदाराला दिलेल्या उत्तरात कळवले होते की, उमेदवाराने किती प्रयत्न पूर्ण केले आहेत, याबद्दलची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्याला त्यांच्या वेबसाइटवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. वरील सल्ला हा शिफारसीच्या स्वरूपाचा असल्याचेही सीआयसीने स्पष्ट केले.






