UPI MDR Charges: देशभरात ‘या’ दिवशी ‘No UPI Day’ ; व्यापाऱ्यांचा QR कोडला विरोध, नेमकं कारण काय?
UPI MDR Charges: UPI व्यवहारांवरील प्रस्तावित शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ पाळण्याचे आवाहन व्यापारी संघटनांनी केले आहे.

UPI MDR Charges: UPI व्यवहारांवरील प्रस्तावित शुल्काच्या विरोधात देशभरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ पाळण्याचे आवाहन व्यापारी संघटनांनी केले आहे. या दिवशी सहभागी व्यापारी UPI पेमेंट स्वीकारणार नसून QR कोड, स्कॅनर आणि साउंड बॉक्स काळ्या कापडाने झाकून निषेध नोंदवण्याची योजना आहे.
या आंदोलनामागे 15 ऑक्टोबरपासून लागू होणारा 0.4 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) हा प्रमुख मुद्दा आहे. नव्या व्यवस्थेनुसार ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर MDR आकारला जाणार असून, मोठ्या व्यवहारांसाठी त्याची कमाल मर्यादा ₹300 असेल.
व्यापारी संघटनांचा दावा आहे की किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, पेट्रोलियम आणि इतर अनेक व्यवसायांमध्ये नफ्याचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटवर अतिरिक्त खर्च आल्यास त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. याच कारणामुळे विविध व्यापारी संघटना MDR मागे घेण्याची मागणी करत आहेत.

महाराष्ट्रातही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) तसेच ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन,
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन आणि इतर संघटनांनी 2 ऑक्टोबरच्या निषेधाला पाठिंबा दर्शवला आहे. MACCIAशी संलग्न सुमारे 500 संघटनांच्या माध्यमातून हा मुद्दा सरकारसमोर मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 23 सप्टेंबरला मध्य प्रदेशातील अनेक व्यापाऱ्यांनी ‘नो UPI डे’ पाळत QR कोड काळ्या कापडाने झाकले आणि ग्राहकांना रोख रकमेने पेमेंट करण्याचे आवाहन केले. त्यामुळे 2 ऑक्टोबरच्या देशव्यापी निषेधाकडे व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे





