UPI 123Pay: डिजिटल पेमेंटच्या जमान्यात, अजूनही स्मार्टफोन आणि इंटरनेटपासून दूर असलेल्या कोट्यवधी लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. आता साध्या फीचर फोनवरून (Keypad Mobile) आणि इंटरनेटशिवाय देखील UPI पेमेंट करणे शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ‘UPI 123Pay’ या महत्त्वाकांक्षी योजनेला इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने NPST (नेटवर्क पीपल सर्विसेज टेक्नोलॉजीज लिमिटेड) आणि MissCallPay च्या सहकार्याने लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. काय आहे ‘UPI 123Pay’ प्रणाली? ‘UPI 123Pay’ ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सुरू केलेली एक अनोखी पेमेंट सिस्टीम आहे. या प्रणालीमुळे फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना देखील UPI व्यवहारांची सुविधा उपलब्ध होते. या सेवेसाठी केवळ तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असावा लागतो आणि तुमच्याकडे कॉल करण्याची सुविधा असलेला साधा फोन असणे पुरेसे आहे. या व्हॉईस-आधारित (Voice-Based) प्रणालीमुळे इंटरनेटची किंवा ॲपची गरज लागत नाही. ग्राहक फक्त एक मिस्ड कॉल देऊन किंवा व्हॉईस कमांड वापरून पैसे पाठवणे, स्वीकारणे किंवा बँक बॅलन्स तपासणे असे व्यवहार करू शकतात. ‘UPI 123Pay’ चा वापर कसा करावा? ही प्रणाली वापरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. कॉल करा: आपल्या फोनमधून 08045163666 या क्रमांकावर कॉल करा. भाषा निवडा: कॉल लागल्यावर आपल्या सोयीची भाषा निवडा. खाते जोडा: प्रथमच वापरणाऱ्यांनी आपले बँक खाते लिंक करावे (सूचनांचे पालन करून). पर्याय निवडा: त्यानंतर “Send Money” (पैसे पाठवा) किंवा “Check Balance” (बॅलन्स तपासा) यांसारखे पर्याय निवडा. माहिती भरा: पैसे पाठवण्यासाठी, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर, UPI ID किंवा बँक डिटेल्स प्रविष्ट करा. रक्कम आणि PIN: व्यवहाराची रक्कम टाका आणि आपला UPI PIN टाकून ट्रान्झॅक्शन पूर्ण करा. व्यवहार पूर्ण: व्यवहाराची पुष्टी (Confirmation) झाल्यावर कॉल कट करा. ‘UPI 123Pay’ ची मुख्य वैशिष्ट्ये- इंटरनेट नाही: सर्वात मोठी खासियत म्हणजे ही सुविधा इंटरनेटशिवाय काम करते, ज्यामुळे ग्रामीण भागातील आणि फीचर फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा होईल. सुरक्षितता: इंटरनेटची आवश्यकता नसल्याने सायबर फसवणुकीचा धोका कमी होतो. बहुभाषिक: ही प्रणाली १२ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. इतर सुविधा: यातून बँक बॅलन्स तपासणे, मागील व्यवहार पाहणे आणि UPI PIN व्यवस्थापित करणे यांसारख्या सुविधाही मिळतात. IOB आणि NPST ची भागीदारी – इंडियन ओव्हरसीज बँकेने या महत्त्वपूर्ण प्रणालीला आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेटवर्क पीपल सर्विसेज टेक्नोलॉजीज लिमिटेड (NPST) सोबत भागीदारी केली आहे. NPST ‘MissCallPay’ च्या मदतीने ही व्हॉईस-आधारित सेवा लागू करणार आहे. NPST चे अध्यक्ष दीपक चंद ठाकूर यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, “व्हॉईस-आधारित UPI हे असे पाऊल आहे, ज्यामुळे भारतातील प्रत्येक स्तरातील लोक डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडले जातील.” सध्या भारतात सुमारे ८५ कोटी लोक UPI वापरत नाहीत, त्यापैकी जवळपास ४० कोटी लोक फीचर फोन वापरतात. IOB आणि NPST च्या या भागीदारीमुळे या सर्व फीचर फोन वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंटचा मार्ग खुला होणार आहे.