Upendra Kushwaha : रालोमोच्या अध्यक्षपदी उपेंद्र कुशवाह यांची निवड
राष्ट्रीय लोक मोर्चाचे (रालोमो) संस्थापक उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांची त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बिहारमधील पक्ष असणारा रालोमो सत्ताधारी एनडीएचा घटक आहे.

Upendra Kushwaha : राष्ट्रीय लोक मोर्चाचे (रालोमो) संस्थापक उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांची त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बिहारमधील पक्ष असणारा रालोमो सत्ताधारी एनडीएचा घटक आहे. राज्यसभेचे खासदार असणाऱ्या कुशवाह यांनी वर्ष २०२३ मध्ये रालोमोची स्थापना केली. त्यानंतर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
रालोमोचे शनिवारी दिल्लीत अधिवेशन झाले. त्यामध्ये प्रथमच संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया मार्गी लावण्यात आली. त्यानुसार, कुशवाह (Upendra Kushwaha) यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बिहारमध्ये मागील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये घवघवीत यश मिळवून एनडीएने त्या राज्याची सत्ता राखली.
रालोमोचे ४ आमदार आहेत. त्या पक्षाला बिहार मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यामुळे कुशवाह यांचे पुत्र दिपक प्रकाश यांची मंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, ते विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना आमदार बनणे अनिवार्य आहे. मात्र, अद्याप ते आमदार बनू शकले नसल्याने त्यांच्या मंत्रिपदावर कायम राहण्याविषयी सस्पेन्स निर्माण झाला आहे. अर्थात, त्यांच्या मंत्रिपदी कायम राहण्याबाबत कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी विश्वास व्यक्त केला आहे.






