Nepal Army : भारतीय लष्करप्रमुख द्विवेदींना नेपाळची मानद जनरल पदवी…

काठमांडू – नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी 1950 पासूनची दशके जुनी परंपरा कायम ठेवत गुरुवारी येथील राष्ट्रपती भवन (शीतल भवन) येथे आयोजित एका विशेष समारंभात भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना नेपाळ लष्कराचे मानद जनरल ही पदवी प्रदान केली. पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेले जनरल द्विवेदी बुधवारी त्यांचे नेपाळचे समकक्ष जनरल अशोक सिग्देल यांच्या निमंत्रणावरून पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर येथे आले.
यावेळी राष्ट्रपतींनी जनरल द्विवेदी यांना तलवार, मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान केले. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यासह विविध मान्यवर विशेष कार्यक्रमाला उपस्थित होते. नेपाळ लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, 1950 पासून भारत आणि नेपाळच्या सैन्यामध्ये सुरू असलेल्या संबंधांचा एक भाग म्हणून, एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना जनरल ही पदवी देण्याची परंपरा आहे.
नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात द्विवेदी यांनी जनरल सिग्देल यांची भेट घेतली आणि दोन्ही सैन्यांमधील सहकार्याबाबत चर्चा केली. भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी सांगितले की, नेपाळ आणि भारत यांच्यातील लष्करी द्विपक्षीय संबंधांना पुढे नेण्यावर चर्चा केली. तत्पूर्वी, सकाळी जनरल द्विवेदी यांनी काठमांडूच्या तुंडीखेल येथील लष्करी मंडपात बीर स्मारक (शहीद स्मारक) येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लष्कराच्या मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.





