नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी २५ ते २८ ऑगस्ट दरम्यानच्या अल्जेरियाच्या भेटीसाठी प्रस्थान केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अलीकडील भेटींनंतर लगेचच ही भेट होत असल्याने भारत-अल्जेरिया संबंध दृढ करण्याला देण्यात आलेले महत्त्व यातून अधोरेखित होते. या भेटीचा उद्देश भारत आणि अल्जेरिया यांच्यातील संरक्षण व सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणे हा आहे. यात लष्करा अंतर्गत सहकार्य वाढवणे, प्रादेशिक व जागतिक सुरक्षा आव्हानांवरील दृष्टिकोन सामायिक करणे आणि संरक्षण उद्योग सहकार्याच्या संधी शोधणे यावर भर असेल. या भेटीत जनरल द्विवेदी हे अल्जेरियाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी उच्चस्तरीय बैठका घेतील. यात जनरल सईद शानेग्रीहा, संरक्षणमंत्री प्रतिनिधी व पीपल्स नॅशनल आर्मीचे लष्करप्रमुख; लेफ्टनंट जनरल मोस्तेफा स्माली, स्थलसेना कमांडर; आणि भारताच्या अल्जेरियातील राजदूत डॉ. स्वाती कुलकर्णी यांचा सहभाग असेल. ते तामेंतफोस्त येथील स्कूल ऑफ कमांड अँड मेजर स्टाफ, शेरशेल मिलिटरी अकादमी यांसारख्या महत्त्वाच्या लष्करी संस्थांना भेट देतील तसेच शहीद स्मारकाला अभिवादनही करतील. या भेटीपूर्वी भारतीय संरक्षण उद्योगांनी ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान अल्जियर्स येथे आयोजित संरक्षण परिषदेमध्ये आपली क्षमता प्रदर्शित केली होती. यामुळे संरक्षण उद्योग व तंत्रज्ञान सहकार्याची पायाभरणी झाली आहे.