समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र रुपेरी पडद्यावर उलघडणार; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘रघुवीर’ चित्रपट

महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता हि दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘रघुवीर’ या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट?
‘रघुवीर’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. ‘जय जय रघुवीर समर्थ’चा मंत्र जपत 23 ऑगस्ट या दिवशी ‘रघुवीर’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘रघुवीर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टवर चित्रपट समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे देखील दाखवण्यात आले आहे.
‘हे’ कलाकार झळकणार महत्वाच्या भूमिकेत?
या चित्रपटात समर्थांच्या भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार आहेत. या चित्रपटात विक्रम यांच्यासोबत ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने आदी कलाकारही विविध व्यक्तिरेखांमध्ये दिसतील. डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.





