कानपूरमध्ये जोरदार स्फोट; मरकज वाली मशिदीजवळ घटना, आठ जखमी

कानपूर (उत्तर प्रदेश) – शहरातील मिश्री बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार स्फोटाने एकच खळबळ उडाली. या घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उर्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संध्याकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास मूलगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत मरकज वाली मशिदीजवळ हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज जवळपास पाचशे मीटरपर्यंत ऐकू आला. अचानक झालेल्या या घटनेमुळे बाजारात अफरातफर माजली आणि नागरिक रस्त्यावर धाव घेत पळ काढू लागले.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या अनेक दुकानांच्या व घरांच्या भिंतींमध्ये भेगा पडल्या. घटनेनंतर मूलगंजसह आसपासच्या पोलीस ठाण्यांतील पथके आणि बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की फॉरेन्सिक आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी तपास करत आहे. अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे मूळ कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी कळविले. स्कूटीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.





