UP Election 2027 : यूपीच्या राजकारणात तिसरी आघाडी ? ओवैसी-चंद्रशेखर आजाद एकत्र; १५० जागा लढवण्याची तयारी
UP Election 2027 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ साठी असदुद्दीन ओवैसी आणि चंद्रशेखर आजाद यांची युती होण्याची शक्यता. तिसऱ्या मोर्चाची १५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी.

UP Election 2027 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (१२ नोव्हेंबर) लखनऊ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या नव्या आघाडीला तिसरा मोर्चा म्हणून पुढे आणण्याची तयारी सुरू आहे. वृत्तसंस्था आणि माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील सुमारे १५० विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची या मोर्चाची योजना आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्षासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहू शकते.
लखनऊमध्ये युतीची घोषणा होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आजाद आणि असदुद्दीन ओवैसी गुरुवारी दुपारी १२ वाजता लखनऊ येथील दयाल पॅराडाइज हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी नव्या आघाडीचे नाव, जागावाटप आणि आगामी निवडणुकीची रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे.
या मोर्चात अन्य राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात या आघाडीचा विस्तार होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
१५० जागांवर उमेदवार देण्याची तयारी
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सुमारे १५० जागांवर निवडणूक लढवण्याचे नियोजन या नव्या आघाडीकडून केले जात असल्याचे वृत्त आहे. राज्यात भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात प्रमुख राजकीय लढत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ओवैसी आणि चंद्रशेखर आजाद यांची युती निवडणुकीतील मतांची गणिते बदलू शकते.
मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार, उमेदवार कोण असतील आणि इतर पक्षांना आघाडीत स्थान मिळणार का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अखिलेश यादव आणि काँग्रेससोबत चर्चा फिस्कटली?
असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशात राजकीय आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले होते. समाजवादी पक्ष आणि काँग्रेससोबत युती करण्याच्या शक्यताही तपासण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता आझाद समाज पक्षासोबत युतीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
२०१७ आणि २०२२ मध्ये AIMIM ला एकही जागा नाही
ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने यापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन वेळा नशीब आजमावले आहे. मात्र, दोन्ही निवडणुकांत पक्षाला यश मिळाले नाही.
– २०१७ ची निवडणूक : AIMIM ने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. अनेक ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली होती.
– २०२२ ची निवडणूक : या निवडणुकीत पक्षाने सुमारे १०० ते १०३ जागांवर उमेदवार दिले होते. तरीही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
आता चंद्रशेखर आजाद यांच्यासोबत आघाडी करून २०२७ च्या निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याचा ओवैसी यांचा प्रयत्न आहे.
AIMIM प्रवक्त्यांचा अखिलेश यादव यांच्यावर निशाणा
युतीच्या चर्चेदरम्यान AIMIM चे प्रवक्ते शादाब चौहान यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी, आमचा प्रस्ताव नाकारल्याची किंमत मोजावी लागेल, अशा शब्दांत इशारा दिला.
तसेच अखिलेश यादव यांच्या शिक्षणाशी संबंधित विषयांवर खुल्या चर्चेचे आव्हानही त्यांनी दिले. त्यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.
नव्या आघाडीचा निवडणुकीवर किती परिणाम होणार?
उत्तर प्रदेशच्या राजकारणात जातीय आणि सामाजिक समीकरणांना मोठे महत्त्व आहे. चंद्रशेखर आजाद यांचा दलित समाजातील प्रभाव आणि ओवैसी यांचा मुस्लिम मतदारांमधील जनाधार या युतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची मते प्रत्यक्षात एकत्र येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नव्या आघाडीला किती यश मिळेल, हे उमेदवारांची निवड, जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर अवलंबून असेल. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आघाडीमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नवे समीकरण तयार होणार की निवडणुकीतील मतविभाजनापुरताच तिचा प्रभाव राहणार, हे २०२७ च्या निवडणुकीत स्पष्ट होईल.




