UP Election 2027 : यूपी निवडणुकीत योगींची सत्ता कायम राहणार? सर्व्हेतून समोर आला जनतेचा कल
UP Election 2027 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 पूर्वी झालेल्या यूपी मेगा सर्व्हेत योगी सरकार, एनडीए आणि जन-जीबाबत जनतेचा कल समोर आला आहे.

UP Election 2027 : उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः जेन-जीचा कल कोणत्या बाजूने राहणार, याबाबत चर्चा सुरू आहे. न्यूज18 आणि पीव्हॅल्यू अॅनालिटिक्सने केलेल्या यूपी मेगा सर्व्हेत योगी आदित्यनाथ सरकार आणि आगामी निवडणुकीबाबत जनतेचा कल समोर आला आहे.
सर्व्हेत सहभागी 56 टक्के लोकांनी आगामी निवडणुकीत जेन-जीची भूमिका महत्त्वाची राहील, असे मत व्यक्त केले. 16.2 टक्के लोकांनी मात्र जेन-जीची भूमिका महत्त्वाची राहणार नसल्याचे सांगितले. तर 14.2 टक्के लोकांनी जेन-जीबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे म्हटले आहे.
एनडीएला 66.6 टक्के पाठिंबा –
सर्व्हेनुसार, 66.6 टक्के लोकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. 26.4 टक्के लोकांनी समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला, तर 5.4 टक्के लोकांनी बसपला पाठिंबा दर्शवला. तसेच 66.6 टक्के लोकांना एनडीए पुन्हा सरकार स्थापन करेल, असे वाटते.
याशिवाय 65.2 टक्के लोकांनी भाजपला सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी, असे मत व्यक्त केले. 77.1 टक्के लोक योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सर्व्हेतून समोर आले. तर 66.2 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे म्हटले आहे.
सर्व्हेत कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, आरोग्य, शिक्षण, भ्रष्टाचार आणि रोजगार या मुद्द्यांवरही नागरिकांची मते जाणून घेण्यात आली.
उत्तर प्रदेशात जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजप सलग दोन कार्यकाळांपासून सत्तेत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या सर्व्हेकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, हा सर्व्हे असून प्रत्यक्ष मतदानानंतरच कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होईल. याआधीही अनेक सर्व्हे चुकीचे ठरलेले आहेत.





