#UP Election 2022: उत्तर प्रदेशातील प्रचार सामग्री विक्रेत्यांचा जीव भांड्यात

लखनौ – निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष प्रचारावरील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात प्रचार सामग्रीचा खप वाढल्याने विक्रेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
निवडणूक आयोगाने मागील महिन्यात उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यावेळी आयोगाने करोना संकटाचा विचार करून जाहीर सभा, पदयात्रांवर बंदी घातली. त्यामुळे राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रारंभीच्या काळात व्हर्च्युअल प्रचारावर भर देणे भाग पडले. त्यातून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यातील प्रत्यक्ष प्रचारावर मर्यादा आल्या.
साहजिकच, राजकीय पक्षांचे ध्वज, फलक, टोप्या, चिन्ह, बिल्ले यांची विक्री थंडावली. त्यामुळे त्या सामग्रीची विक्री करणारे दुकानदार चिंतेत पडले. अर्थात, करोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने प्रचारावरील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे उत्तर प्रदेशात जाहीर प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. सातपैकी चार टप्प्यांच्या प्रचारासाठी आवश्यक सामग्रीची विक्रीही वाढली आहे.





