Pimpri : उन्हाची तीव्रता वाढल्याने थंड पदार्थ विक्रेत्यांना अच्छे दिन !

वडगाव मावळ : मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. सध्या तापमान ३७ अंश सेल्सियसच्या आसपास असल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्यासोबत प्राणीमात्रांनाही उष्णतेची झळ सोसावी लागत आहे. तीव्र कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पदार्थाचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घेत काही व्यवसायिकांनी तात्पुरती थंड पदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. यामध्ये उसाचा रस, लिंबू रस, निरा, थंडगार सरबत, कलिंगड, लस्सी, ताकासह सर्व कोल्ड्रिंक्स पदार्थांची विक्री वाढली आहे.
वडगाव, तळेगाव, कामशेत या शहरांबरोबरच ग्रामीण भागातही थंड पदार्थांची विक्री जोरात सुरु आहे. काही ठिकाणी चढ्या भावाने थंडगार पदार्थाची विक्री केली जात आहे. पुणे- मुंबई महामार्ग, तळेगाव- चाकण मार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्ते यांच्या रस्त्याच्या कडेला अशी दुकाने तात्पुरती थाटली असून कडक उन्हामुळे हैराण झालेले नागरिक त्याठिकाणी थंडगार पदार्थ घेण्यासाठी येत असतात.
याशिवाय गरीबाचा फ्रीज अर्थात मातीचा माठ विक्रीची दुकाने वाढली आहेत. घराघरात फॅन, कुलर, फ्रीज यांचा आश्रय व आधार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सकाळ, संध्याकाळ जॉगिंग करणारे थंड हवेत फिरायला जाऊ लागले आहेत. कडक उष्णतेमुळे नागरिकांना उशिरापर्यंत झोप येत नाही, त्यामुळे घराच्या अंगणात, गच्चीवर, मोकळ्या जागेत फिरणे, गप्पा मारणे हे प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसतात. शाळा, महाविद्यालये मोठे चौक आदी ठिकाणी आईस्क्रीम विक्रेते, गोळे, कुल्फी यांच्या गाड्या आहेत, अशा विक्रेत्यांनाही आता अच्छे दिन आले आहेत.
उन्हामुळे थंड पदार्थाला चांगली मागणी आहे. त्यामुळे आम्हा व्यावसायिकांचा धंदा देखील चांगला होतो आहे. स्वच्छ व ताज्या फळांचा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ताक, दही, लस्सी यांनाही मागणी चांगली आहे.
– तुषार पहिले, कोल्ड्रिंक्स विक्रेते
कडक उन्हामुळे सर्वसामान्यांना परवडणारा गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माठामुळे कडक उन्हात देखील स्वच्छ, थंडगार पाणी मिळते. त्यामुळे फ्रीज पेक्षा माठातील थंडगार पाणी पिण्याकडे कल अधिक आहे.
– किशोर दरेकर, माठ विक्रेते
थंड पदार्थांचे दर (एक ग्लास प्रमाणे)
लिंबू सरबत – २० रूपये
जीरा सरबत – ३० रूपये
कलिंगड सरबत – ३० रूपये
मसाला पेरू सरबत – ३० रूपये
ताक – २० रूपये
लस्सी – ३० रूपये





