रूपगंध: विश्वासार्हतेवर अतूट विश्वास

उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत जावे’, असा सल्ला देणारे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, त्याआधी दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या आणि ते भारतीय जनता पक्षाशी युती करून राज्यात सरकार स्थापन करणार असल्याच्या वावड्या समाज माध्यमांत उमटत आहेत.
काही पत्रकार छातीठोकपणे याची ग्वाहीही देत आहेत. मात्र, अशा कोलांटउडीने शिवसेनेच्या विश्वासार्हतेवर नक्कीच परिणाम होणार आहे. ज्या ज्या राजकीय पक्षांनी अशा विसंगत भूमिका घेतल्या त्यांना जनतेच्या मनात स्थान राहिले नाही, हे मात्र आजवरच्या वाटचालीतून दिसून आले आहे.
राजकीय विश्वासार्हता हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल 13 आमदार राज्यातील जनतेने निवडून दिले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी मोदींची भलावण करणारी भाषणे केली. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.
त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा भाजप आणि मोदींना लक्ष्य बनवले. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच मनसेच्या पदरी आला. भले या काळात दोनदा त्यांनी इंजिनाची दिशा बदलली. मात्र, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात मनसे अयशस्वी ठरली.
देशाचे नेते म्हणून महाराष्ट्रात गौरवले जाणारे दिग्गज नेते शरद पवार, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये त्यांचे असणारे संबंध सर्वश्रुत आहेत. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस हा अनेक “वतनदारां’ना सोबत घेऊनही 2004 च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातून या पक्षाचे खासदार होते केवळ नऊ. त्याआधी 1999 च्या निवडणुकांत त्यांचे खासदार होते आठ, तर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांत त्यांचे खासदार होते चार.
शरद पवार यांचा जनतेवर असणारा प्रभाव पाहता त्यांना लोकसभेत अधिक सदस्य मिळवणे अपेक्षित होते. मात्र जनतेने त्यांना फार मोठ्या विजयाचा आनंद मिळू दिला नाही, याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची राजकीय विश्वासार्हता राहिली नाही.
त्या तुलनेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती 30 वर्षे राहिली. या युतीचा पहिला आमदार म्हणून शिवसेना नेते वामनराव महाडिक परळ मतदारसंघातून, कामगार नेते कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करून विजयी झाले. त्यानंतर युतीचा वारू उधळला. 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या.
निवडणुकांनंतर त्यांनी शिवसेनेशी युती केली. मात्र या काळात त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या कळपात ओढून स्वबळावर 2019मध्ये विजय मिळवण्याची तजवीज केली. मात्र, अपवाद वगळता हे गटबदल करणारे सारे नेते पराभूत झाले. त्यात हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल अशा अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका सहन करावा लागला.
हे झाले महाराष्ट्राचे. राष्ट्रीय स्तरावर भूमिका बदलणाऱ्या नेत्यांना पराभवाचा फटका सहन करावाच लागतो. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले असले तरी नितीश कुमारांना काही प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षाची साथ देणे मतदारांना रुजले नाही, हे त्या मागचे एक महत्त्वाचे कारण. त्यापूर्वी बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी यांच्या विरोधात राळ उठवण्यात आली.
त्या मुद्द्यावर मंडल आयोगाचे निमित्त करून विश्वनाथ प्रतापसिंह भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले. मात्र ओबीसी वर्ग या मुद्द्यावर त्यांच्या मागे जात आहे हे लक्षात येताच भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा काढून हे सरकार पाडले.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. कारण त्यांनी आपल्या भूमिकेशी बांधिलकी जपली होती. त्यामुळे त्यांचा जनाधार वाढला. याच काळात प्रादेशिक पक्षांचे महत्त्वही राष्ट्रीय राजकारणात वाढले. राष्ट्रीय राजकारणात ज्या प्रादेशिक पक्षांनी आपल्या भूमिका गुंडाळल्या त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
राज्यातही वंचित बहुजन विकास आघाडी आज ज्या प्रमाणात यश मिळवत आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाचा जनाधार त्या तुलनेत कमी होत असताना दिसत आहे. त्यामागे भूमिकांची राजकीय विश्वासार्हता हेच मुख्य कारण आहे. शिवसेना हा मूळचा मराठी माणसांचा पक्ष. हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होताना या पक्षाने आपली प्रादेशिक नाळ तुटू दिली नाही. त्या जोरावरच त्यांनी भारतीय जनता पक्षाला राज्यात कायम दुय्यम स्थानी ठेवले. या पक्षाने आणीबाणीलाही पाठिंबा दिला; तरी जनतेच्या मनात त्यांच्या विषयीच्या विश्वासाला तडा गेला नाही.
स्वाभिमान हा या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जिव्हाळ्याचा शब्द. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची साथ सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा हात हातात घेतला तरी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना ही भूमिका रुचली, पटली. कारण पाच वर्षे शिवसेनेची होणारी गळचेपी ते पाहत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या वळचणीला गेले. त्यातील अपवाद वगळता बहुतांश पराभूत झाले. शरद पवार यांची साथ सोडून स्वगृही परतलेले बहुतांश नेते आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. यानंतर “शरद पवार कोणालाही पाडू शकतात’ असा एक संदेश प्रसारित झाला. त्यात तथ्य कमी होते. बदललेली राजकीय भूमिका मतदारांच्या पचनी पडली नाही, हेच त्याचे खरे कारण होते.
आता पुन्हा शिवसेना जर भारतीय जनता पक्षाच्या जवळ गेली तर ते या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कितपत रुचेल याची शाश्वती नाही. कारण, राजकीय सोयरिक मतदार समजून घेऊ शकतात. मात्र, राजकीय व्याभिचार मतदार आणि कार्यकर्त्यांच्याही पचनी पडत नाही. हे वास्तव विसरलेल्या सर्व नेत्यांना मतदारांनी आस्मान दाखवले आहे. याची जाण राज्यातील सत्ताधारी नेत्यांना नक्कीच आहे. त्यांच्या साऱ्या भूमिकांकडे जनता पाहत आहे. प्रश्न अखेर राजकीय विश्वासार्हतेचा आहे.
श्रद्धा गोखले





