ट्रम्प यांच्या शुल्क धोरणाने डॉलर कमकुवत, गुंतवणूकदार हैराण, विश्वासार्हतेला धक्का, कर्जरोख्यांची विक्री वाढली

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक आयात शुल्क धोरणाचा वापर करून अमेरिकन आणि जागतिक शेअर बाजारावर गेल्या आठवड्यात मोठा परिणाम केला. त्यामुळे जगातील उद्योजक आणि गुंतवणूकदार हैरण झाले. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या भांडवल बाजारावर विसंबून राहायचे की नाही या संदर्भात जागतिक गुंतवणूकदार विचार करीत असल्याचे वातावरण आहे.
ट्रम्प यांनी पंधरा दिवसापूर्वी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या कर्जरोख्यांच्या विक्रीत वाढ झाली. अमेरिकेचे सध्या 26 लाख कोटी डॉलरचे कर्जरोखे बाजारात आहेत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे अस्वस्थ झालेल्या देश विदेशातील गुंतवणूकदारांनी हे रोखे विक्रीस काढण्यास सुरुवात केली होती.
त्याचा परिणाम अमेरिकेच्या डॉलरवरही होऊन डॉलर कमकुवत होत होता. यामुळे आयात शुल्काची अंमलबजावणी झाल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक गडगडत असतानाच अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत होता. या कारणामुळे ट्रम्प यांच्यावर या धोरणातवर स्थगिती आणण्यासाठी दबाव निर्माण झाला होता.
ट्रम्प यांचे देणगीदार आणि रिपब्लिकन पक्षाचे नेतेही ट्रम्प यांच्या या धोरणावर जाहीरपणे टीका करत होते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी माघार घेतली. मात्र त्यामुळे अमेरिकेच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे.





