Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घेतला आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कांदा उत्पादकांना जबर फटका बसलाच परंतु त्याचबरोबर आंबा, मका, केळी, पपई व कांदा, भगर, उन्हाळी मूग, बाजरी यासह इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच 100 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तर शेतात काम करणाऱ्या मजुरावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीट भट्टी चालकांना बसला असून जिल्ह्यातल्या विविध भागातील वीटभट्ट्यांवरून दहा लाख पेक्षा अधिक कच्च्या खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हे नुकसान अधिक असल्याचे वीट भट्टी चालकांनी सांगितले आहे. अजून तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत आणि दक्षिण तेलंगणापासून वरच्या बाजूला कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पावसासाठी ते पोषक वातावरण असून 9 मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही भागांमध्ये ऊन सावलीचा खेळही पाहायला मिळेल. राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, पूर्वेकडील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागानं वादळी पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट दिला आहे. हा आठवडा महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे.