मराठवाड्यात अवकाळीचे थैमान; ३ शेतकऱ्यांचा मृत्यू, कांद्यासह फळपिकांना मोठा फटका

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असतानाच सोमवारी राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला. मात्र या पावसाचा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
यात गंगापूर व वडवणी, अंबाजोगाई तालुक्यांतील तीन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. गारपीटीने अनेक जिल्ह्यांत फळपिकांचे मोठे नुकसान झाले, तर नाशिकमध्ये शेतात उघड्यावर असलेला कांदा आणि आंब्याला फटका बसला.
गंगापूर तालुक्यातील कोडापूर शिवारात सोमवारी दुपारी अचानक आकाशात ढगांची गर्दी जमली आणि सुसाट वारा सुटला. या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून जनावरे दगावतील म्हणून शेतकरी अशोक नंदू म्हस्के (२५) याने लिंबाच्या झाडाखाली बांधलेली जनावरे सोडली व ते वस्तीसमोर बांधत असताना अचानक वीज कोसळली. यात अशोक भाजून गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकरी अभिमान नलबे शेतात झाडाखाली थांबले होते. सायंकाळी ६ वाजता जोरदार वारे सुटून अवकाळी पाऊस सुरू झाला. यात त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच मृत्युमुखी पडले. अंबाजोगाई तालुक्यातील मगरवाडी येथे वीज पडून सचिन मधुकर मगर (३८) यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास गारांचा पाऊस झाला. वादळाने अनेक ठिकाणी झाडे कोसळली. जालना आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारांचा मोठा पाऊस झाल्याने फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.





