पिंपरी | अवकाळी पावसाचा तीळ पिकाला फटका

इंदोरी, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसांपासून मावळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून परिसरात झालेल्या पावसामुळे तीळ पिकाला फटका बसला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱयांनी वर्तविली आहे.
मावळ हा तसा तांदुळ उत्पानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेकजण इतर पिकेही घेतात. त्यात काहीजण भाजीपाला तर, ज्वारी, बाजरीसह इतर पिकेही घेतात. सध्या सर्वत्रच अवकाळी पावसाने जोर धरला आहे. ठिकठिकाणी पाऊस पडत आहे.
परिणामी काढणीला आलेल्या पिकाचे पावसामुळे नुकसान होत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. मावळ परिसरात अनेकांनी तीळाचे पिक घेतले आहे. मात्र, परिसरा गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पीक पावसामुळे ओलेचिंब झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱयांना पसणार आहे.
सुदुंबरे परिसरातील अनेक शेतकऱयांनी तीळ पिकाचे घेतले आहे. तीळ पिकांतून कमी कालावधीत चांगली मिळकत होते. तसेच, वर्षभर दरही चांगला मिळत असल्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी उन्हाळ्यात तिळाची लागवड करतात.
मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तीळ पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांनी तीळ पिकांची कापणी करून ढीग लावले आहेत. तर, काहीजण तीळ पिकाची कापणी करीत आहेत.





