येरवड्यात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत; आळंदी रोडवरील म्हस्के वस्ती पुलावर पाणीच पाणी

येरवडा : येरवडा परिसरातील आळंदी रोडवरील म्हस्के वस्ती पुलाजवळ सोमवारी (दि. १९) जोरदार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सकाळीच म्हस्के वस्ती पुलाची पाहणी करून साचणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा करण्याच्या सूचना मलनिस्सारण आणि पथ विभागाला दिल्या होत्या. याचवेळी, ढोले रोड क्षेत्रीय कार्यालयात उपायुक्तांनी आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पावसामुळे तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
जोरदार पावसामुळे येरवड्यासह शहराच्या इतर भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पालिका प्रशासनाकडून पाणी निचरा केला जात आहे. गटारी आणि नाल्यांच्या अपुऱ्या स्वच्छतेमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





