Nagar : अवकाळी पावसाने लाल कांद्याचे नुकसान

नारायणडोहो : नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे. विशेषत: काढणीस तयार असलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसात भिजल्यामुळे काढणीस आलेल्या कांद्याचा अक्षरशः ‘लाल चिखल’ झाला आहे. तालुक्यातील जेऊर पट्ट्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, लाल कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील जेऊर पट्टा हा कांदा उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो. या पट्ट्यात गुरुवारी ( दि.५) सायंकाळी तसेच शुक्रवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला लाल कांदा तसेच काढणीला आलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा लाल कांदा काढून विक्री झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही कांदा शेतातच पडून आहे. अशा शेतकऱ्यांना मात्र अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे पहावयास मिळते. तालुक्यातील इतर काही भागात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले असले तरी जेऊर पट्ट्यात मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे.
काढणीला आलेल्या लाल कांद्याच्या गाभ्यात अवकाळी पावसाचे पाणी गेल्याने कांदा सडत आहे. तसेच भिजलेला कांदा तत्काळ बाजारात पाठवावा लागतो परंतु भिजलेल्या कांद्यास योग्य तो बाजारभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लाल कांदा लागवडीनंतर विविध रोगांनी ग्रासला गेला होता. त्यामुळे कांद्याचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधांची फवारणी करण्यात आली होती. रोपांचीही पावसामुळे वाताहात झाली होती. मोठा खर्च करून लाल कांद्याचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर मात्र पाणी फेरले आहे.





