पिंपरी | मावळ तालुक्याच्या पूर्वपट्याला अवकाळी पावसाने झोडपले

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – अवकाळी पावसाने सायंकाळी मावळ तालुक्याच्या पूर्वपट्याला झोडपून काढले. सुमारे तासभर चाललेल्या या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. पूर्वेकडून आलेल्या पावसाने तळेगाव, इंदुरी, सोमाटणे फाटा, वडगाव, वरळी, आंबी, नानोली या पट्ट्यात जोरदार हजेरी लावली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाने पुन्हा पूर्वपट्याला जोरदार तडाखा दिला.
या पावसाने खरीप भात पीक तसेच सोयाबीन भुईमूग आणि कडधान्य पिकाच्या पूर्वमशागतीच्या कामाला चांगली सुरुवात होईल. शेतकरी मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे. मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे
दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने लागोपाठ मावळ तालुक्याच्या सर्व भागांना झोडपून काढले होते. या पावसानंतर मावळ तालुक्यातील खरीप भात उत्पादक शेतकऱ्यांनी भात पिकाच्या पूर्वमशागतीची कामे हाती घेतली होती. तर काही ठिकाणी भाताच्या रोपाची लागणही केली होती.
शेतकरी आपापल्या कामाला लागले होते. या पावसामुळे आता खरीप भात पिकाची रोपे तयार करण्यासाठी शेतकरी जास्त वेळ देतील. मावळ तालुका हा प्राधान्याने खरीप भात पीक घेणारा महत्त्वाचा आणि अग्रेसर तालुका आहे या तालुक्यात सुमारे साडेबारा ते तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते.
त्यासाठी शेतकरी हे मान्सूनचा पाऊस येण्यापूर्वी या भात पिकाच्या मशागतीची सर्व कामे करत असतात. भात पिकाची रोपे तयार करणे, पाऊस पडल्यानंतर त्यांची काळजी घेणे आदी कामावर बहुतेक शेतकरी लक्ष ठेवून असतात. त्यातच मंगळवारी सायंकाळी सहानंतर पूर्वपट्ट्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते. कामासाठी बाहेर गेलेले आणि नोकरदार वर्ग यांची मात्र यामुळे तारांबळ झाली. पावसाची पूर्व माशागतीसाठी गरज होती ती पूर्ण झाल्याने आता शेतकरी अधिक वेगाने कामाला लागतील.




