Pimpri : पुनावळ्याच्या नियोजनशून्य विकास

पिंपरी : पुनावळे परिसरातील मुख्य भाग झपाट्याने विकसित होत असून, मागील काही वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणावर शहरीकरणाचा विस्तार झाला आहे. अनेक नवीन निवासी इमारती आणि वसाहती उभ्या राहत असताना आवश्यक नागरी सुविधांचे नियोजन मात्र दुर्लक्षित राहिले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या परिसरात रस्ते आणि ड्रेनेजचे काम सुरू आहे. परंतु या कामांची गती अत्यंत संथ असून, संबंधित यंत्रणांकडून नियोजनाचा अभाव जाणवतो. रस्त्यांचे खोदकाम सुरू असताना त्याच रस्त्यावर रहदारी देखील सुरू आहे. परिणामी नागरिकांना वाहन चालवताना किंवा चालत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कामासाठी खोदलेले खड्डे वेळेवर भरले जात नाहीत, खड्ड्यांमधून काढला जाणारा राडारोडा, माती आणि साहित्य रहदारीच्या रस्त्यांवर टाकले जात असल्याने रस्ते पूर्णपणे अडवले जातात. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागते आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. पर्यायी रस्त्यांची सोय न केल्यामुळे नागरिक अडकून पडतात.
तसेच रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील नागरिक धोक्यात आले आहेत. डासांचा त्रास, रोगराईचे संभाव्य संकट यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.
शहराचा विकास होणे आवश्यक असले तरी तो नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या सुरू असलेली कामे वेळेत, दर्जेदार आणि नियोजनपूर्वक पूर्ण झाली नाहीत, तर नागरिकांचा त्रास अधिकच वाढणार आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पर्यायी रस्त्यांची सोय करावी, कचरा व्यवस्थापन सुधारावे आणि कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा अभाव
परिसरात सुरू असलेल्या रस्ते आणि ड्रेनेज कामांमध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचा पूर्णतः अभाव. सार्वजनिक ठिकाणी खोदले गेलेले खड्डे, उघड्यावर ठेवलेले लोखंडी पाइप, सिमेंटचे ढीग, आणि धोकादायक साहित्य याभोवती कोणतीही सुरक्षित कुंपण व्यवस्था नाही. त्यामुळे सामान्य नागरिक, लहान मुले, वृद्ध, आणि महिला यांचा जीव धोक्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस या कामांच्या ठिकाणी कुठलीही प्रकाश व्यवस्था नसल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते.
आम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून येथे घर घेतले, परंतु मुलभूत सुविधांचाच अभाव आहे. रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत, गटारसफाई नाही, कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. प्रशासनाने आमच्या त्रासाची दखल घ्यावी.
अनिकेत चव्हाण, स्थानिक नागरिक





