अल्पवयीन भाच्यावर अनैसर्गिक अत्याचार; न्यायालयाने मामासाठी दिला ‘हा’ निर्णय

पुणे – शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये मामाने अल्पवयीन भाच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पोस्को व अनैसर्गिक अत्याचाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालत दाखल केलेल्या अर्जानुसार मामाला जामीन मंजुर झाला आहे. न्यायमूर्ती बोरकर यांनी योग्य अटी व शर्ती वर हा निकाल दिला.
सुरूवातीला पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, घटना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी मामाला अटक करून विशेष न्यायालय वडगाव मावळ येथे हजर केले होते. तो न्यायालयीन कोठडीत होता. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले होते.
ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला की, हा गुन्हा जमिनीच्या वादातून दाखल झालेला आहे. आरोपी व पीडित मुलाचे आई हे दोघे सख्खे भाऊ बहीण आहेत. दोघातील जमिनीच्या वादाचे रुपांतर या खोट्या पोस्कोच्या गुन्हात झाले आहे. हा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन मंजुर केले. या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना ॲड. अविनाश खुडे, वैभव कड पाटील, हर्षवर्धन रेपे यांनी सहकार्य केले.





