Corona : वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली – सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना चाचणी- संपर्क शोध-उपचार नियमावली, प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे उपाय, कोविड रोखण्यासाठी योग्य वर्तणूक आणि विविध व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन यांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने आज कोविड-19 संसर्गाच्या परिणामकारक नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
या सूचनांची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होणार असून त्या 30 एप्रिल पर्यंत लागू असतील. सुमारे 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये सक्रीय कोविड रुग्णांच्या संख्येत सतत घसरण दिसून आली होती, या कालावधीत कोविड-19 च्या संसर्गाचा प्रसार रोखण्यात मिळविलेल्या यशाचे संकलन करणे हा या नव्या मार्गदर्शक सूचनांचा मुख्य उद्देश आहे.
देशाच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढ लक्षात घेता, या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना चाचणी- संपर्क शोध-उपचार नियमावली, प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे उपाय, कोविड रोखण्यासाठीची योग्य वर्तणूक आणि विविध व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन यांची प्रत्येकाकडून कडक अंमलबजावणी करून घेण्याचे आणि सर्व उद्देशीत गटांसाठी लसीकरण मोहिमेची तीव्रता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे आणि यशस्वीपणे पूर्वपदावर आणणे आणि महामारीवर संपूर्ण नियंत्रण मिळविणे यांच्या सुनिश्चीततेसाठी प्रतिबंधात्मक धोरणाची कडक अंमलबजावणी, केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या इतर मंत्रालयांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तसेच प्रमाणित कार्य पद्धतींचे कडकपणे पालन करणे यावर देखील अधिक भर देण्यात आला आहे.





