केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोलपंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण करत लाखोंची लूट

जळगाव – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा दरोडा मुक्ताईनगर तालुक्यातील करकी गावाजवळील पंपावर पडला आहे. पंपावरील कर्मचा-यांना मारहाण करत व बंदुकीचा धाक दाखवत १ लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
जळगावमध्ये मुक्ताईनगर येते मुंबई-नागपूर महामार्गावरील तीन पेट्रोल पंपावर हा दरोडा पडला आहे. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मालकीच्या पेट्रोलपंपावरही दरोडा टाकण्यात आला. दरम्यान दरोडे खोरांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत पाच पैकी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मुक्ताईनगरच्या राष्ट्रीय महामार्ग ६ वरील रक्षा ऑटो फुएल्स या पेट्रोल पंपावर बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पाच दरोडेखोर मोटरसायकलवरून आले. यावेळी या दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचा-यांना बंदुकीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. सुमारे एक लाख रुपयांची रोकड त्यांनी लुटली.
दरोडेखोरांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच दरोडेखोरांनी जाताना पट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्हींची तोडफोड केली. पेट्रोल पंपातील ऑफिसमध्ये असलेल्या कॉम्प्युटर, प्रिंटरची देखील तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी रात्रीच जिल्ह्यात नाकाबंदी केली. या दरोड्यामध्ये पाच आरोपींचा समावेश होता. यामधील तीन संशयीतांना पोलिसांना ताब्यात घेतले असून दोघा फरारींचा शोध सुरु आहे.





