पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुंबईची वाढ झाल्यानंतर नवी मुंबई शहर विकसित करण्यात आले, त्याप्रमाणे पुण्यासाठी नवीन पुणे विकसित केले पाहिजे. काँग्रेसच्या 60 वर्षांत प्रश्न सोडण्यापेक्षा प्रश्न गंभीर झाले. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. काँग्रेसने जे 60 वर्षांत नाही केले, त्याच्या तीन पट काम भाजपने केले, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. भाजप – महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदानावर गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक, मंदार जोशी, रुपाली पाटील, राजेंद्र काकडे, दत्ता सागरे, वनराज आंदेकर, किरण साळी, हर्षदा फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गडकरी म्हणाले, “गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक दारिद्य्र रेषेबाहेर आले. पुढल्या 25 वर्षांत गरीबी राहणार नाही. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. जेव्हा “कनव्हिन्स’ करता येत नाही ते “कनफ्युज’ केले जाते. विरोधकांकडे कोणताही विचार नाही. कार्यक्रम नाही. त्यामुळे ते “कनफ्यूज’ करत आहेत. कोणतेही सरकार आले तरी घटनेची मूलभूत तत्व बदलता येत नाहीत.’ “गरिबीला जात, धर्म नसतो,.गरिबी, भूकमारी ही खरी समस्या आहे. जे जनतेचा विश्वास संपादन करत नाहीत ते जातीची ढाल पुढे करतात. समाजातील अस्पृश्यता, जातीयता दूर झाली पाहिजे. शिवशाही आणि रामराज्य व्हावे ही भाजपची विचारधारा आहे,’ असेही गडकरी म्हणाले. दहा वर्षांत मोदी सरकारचे काम हा ट्रेलर होता. असली फिल्म बाकी आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएला मतदान करा,’ असे आवाहनही त्यांनी केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, षपुण्याच्या विकासात गिरीश बापट, मुक्ता टिळक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे.’ ही देशाची निवडणूक आहे. यात देशाचे भवितव्य निश्चित होणार आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मिळतो आहे. कारण, गेल्या दहा वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर कामे झाली. यात मेट्रो, ई बसेस, चांदणी चौक, नदी शुद्धीकरण प्रकल्प, मेडिकल कॉलेज मोदींनी पुण्याला दिले. – मुरलीधर मोहोळ, उमेदवार, भाजप-महायुती, पुणे लोकसभा