देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क; केंद्राकडून घेण्यात आला आढावा

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ञ उपस्थित होते.
‘कोरोना‘च्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल – उपमुख्यमंत्री फडणवीस
चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्वभुमीवर आगामी काळात येऊ घातलेल्या उत्सवाच्या तोंडावर सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे महत्त्व डॉ. मांडविया यांनी नमूद केले. कोविड-19 अद्याप संपलेला नाही याकडे लक्ष वेधत आणि या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे दक्ष राहण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. लोकांनी कोविड 19 प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या वर्तनाचा अंगिकार करावा आणि कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
देशामध्ये जर कोणतेही नवे उत्परिवर्तक पसरत असतील तर त्यांचा वेळेत शोध घेण्यासाठी, पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्याची संपूर्ण जेनेटिक सिक्वेन्सिंगच्या मदतीने निश्चित करण्याचे निर्देश डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले. कोणताही नवा उत्परिवर्तक असल्यास कोविड-19 च्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णाचे नमुने जेनेटिक सिक्वेन्सिंगसाठी दररोज इन्साकॉग जिनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीजकडे पाठवावेत अशी विनंती राज्यांना करण्यात आली आहे.
भारतात 19 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णाच्या संख्येत नियमित गतीने घट होत आहे. ही संख्या दिवसाला सरासरी 158 पर्यंत खाली आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, गेल्या 6 आठवड्यांपासून जागतिक दैनंदिन सरासरीमध्ये निरंतर वाढीची नोंद झाली असून 19 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5.9 लाखांपर्यंत नव्या रुग्णांची नोंद होत आहे.
“बीएफ.7′ चा नवा धोका…
बीएफ.7 नवा आणि अतिशय जास्त संसर्गकारक असलेला ओमायक्रॉनचा उत्परिवर्तक चीनमंध्ये खूप जास्त प्रमाणात झालेल्या संसर्गवाढीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच जून 2022 मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित देखरेख धोरणासाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित आणि आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.





