अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी होणारा ‘हलवा समारंभ’ नक्की काय आहे? जाणून घ्या याचे महत्त्व

Union Budget 2025: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा विक्रमी आठवा अर्थसंकल्प असेल. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी खास हलवा समारंभाचे आयोजन केले जाते.
यावर्षी पारंपारिक हलवा समारंभाची तारीख समोर आली आहे. अर्थसंकल्पच्या आधीचा यंदाचा हलवा समारंभ आज (24 जानेवारी) सायंकाळी सायंकाळी 5 वाजता नॉर्थ ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला निर्मला सीतारामन या देखील उपस्थित असतील. अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या ‘लॉक-इन’ प्रक्रियेपूर्वी दरवर्षी पारंपारिक हलवा समारंभ आयोजित केला जातो.
अर्थसंकल्पच्या आधीचा हलवा समारंभ नक्की काय आहे?
हलवा समारंभ हा अर्थसंकल्पाच्या आधीचा एक पारंपारिक व प्रतिकात्मक कार्यक्रम असतो. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ‘लॉक इन’ प्रक्रियेचा हा एक भाग आहे. या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गाजरचा हलवा तयार केला जातो. या कार्यक्रमात अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेले अधिकारी, अर्थमंत्रालयाचे अधिकारी आणि केंद्रीय अर्थमंत्री भाग घेतात.
या समारंभानंतर अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी ‘लॉक इन’ कालावधीत असतात. म्हणजेच, अधिकाऱ्यांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करता येत नाही. त्यांना मोबाइल वापरण्यास देखील बंदी असते. अर्थसंकल्पातील माहिती बाहेर येऊन येऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जाते.
दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल व1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडतील.





