Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन स्वामी निधीची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, गृहनिर्माण प्रकल्पांतील एक लाख युनिटस् पूर्ण करण्यासाठी १५,००० कोटी रुपयांचा एक नवीन स्वामी निधी तयार केला जाईल. या योजनेचा उद्देश ज्या घर खरेदीदारांचे घर अडकले आहे त्यांना दिलासा देणे आहे. केंद्राने नोव्हेंबर २०१९ मध्ये रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वामी नावाचा निधी जाहीर केला होता. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपची कंपनी एसबीआयकॅप व्हेंचर्स लिमिटेड द्वारे व्यवस्थापित केला जातो. पहिल्या निधीच्या यशानंतर सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्वामी निधी-२ ची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की, स्वामी निधी-१ अंतर्गत तणावग्रस्त गृहनिर्माण प्रकल्पांमधील ५०,००० गृहनिर्माण युनिट्स पूर्ण झाले आहेत आणि घर खरेदीदारांना त्यांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, २०२५ मध्ये आणखी ४०,००० युनिट्स पूर्ण होतील, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत होईल. ही कुटुंबे गृहकर्जाचे ईएमआय भरत होते तसेच राहत्या घराचे भाडेही देत होते. सीतारामन म्हणाल्या, या यशाच्या आधारे, सरकार, बँका आणि खाजगी गुंतवणूकदारांच्या योगदानासह स्वामी फंड-२ ची स्थापना मिश्रित वित्त सुविधा म्हणून केली जाईल. एकूण १५,००० कोटी रुपयांच्या निधीसह हा निधी आर्थिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. इतर एक लाख युनिट्स लवकर पूर्ण करायच्या आहेत.