Budget : केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठी भेट; ‘या’ लोकांना टॅक्समधून देण्यात आली सूट

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024-25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. या बजेटमधून त्यांनी करदात्यांना मोठी भेट दिली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅब बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये करण्यात आले आहे. तसेच आयकर कायदा 1961 चे पुनरावलोकन करणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले.
नवीन आयकर प्रणालीमध्ये कर स्लॅब कसे आहेत?
अर्थसंकल्पात मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. जर आपण नवीन आयकर प्रणालीवर नजर टाकली तर, नवीन कर प्रणालीमध्ये ज्यांचे उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे, त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. सरकार आयकर कायदा 87A अंतर्गत 25,000 रुपयांची कर सवलत देणार आहे. इन्कम टॅक्स प्रणालीनुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. 3-6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5%, 6-9 लाख रुपयांच्या स्लॅबवर 10%, 9-12 लाख रुपयांच्या स्लॅबवर 15%, 12-15 लाख रुपयांच्या स्लॅबवर 20% आणि 15 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.
जुन्या आयकर पद्धत कशी होती?
जुन्या आयकर प्रणालीच्या कर स्लॅबवर नजर टाकल्यास, जुन्या कर प्रणालीमध्ये 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सूट आहे. 2.50 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5%, 5 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर भरावा लागत आहे. जुन्या करप्रणालीत 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता. सरकार 2.50 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने 12,500 रुपयांच्या करावर सूट देते.
भारताचा रोडमॅप विकसित करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत ‘विकसित भारत’चा रोडमॅप आहे, ज्यामध्ये रोजगार, कौशल्य विकास, कृषी आणि उत्पादनावर भर देण्यात आला आहे.
मोदी सरकारचा सलग 13 वा अर्थसंकल्प
2014 पासून पंतप्रधान मोदी सरकारचा हा सलग 13वा अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे.





