छत्रपती संभाजीनगर – जगप्रसिद्ध अजंठा वेरुळ लेणी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामुळे वेरुळ लेणीमार्ग बंद करण्यात आला आहे. धुळे रोडवरील वेरुळ लेणी मार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणारा टँक रस्त्यावर पडल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली. या टेम्पोमधील टाकी खाली पडून 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटस लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. तसेच पोलीस व प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने हा टँक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून टँक हटविल्यानंतरच येथील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.