दुर्दैवी घटना ! अंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर पडल्याने 2 वर्षाच्या चिमुकलीची मृत्यू

छत्रपती संभाजीनगर – अंघोळीचे गरम पाणी अंगावर पडल्याने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिद्रा हारून शेख असे या चिमुकलीचे नाव आहे. वडिलांच्या अंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवले होते. त्यावेळी बहिणींसोबत खेळ असताना शिद्राचा धक्का गरम भांडयाला लागल्याने त्यातील पाणी तिच्या अंगावर पडले आणि तिचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
शिद्राचे वडील हारुण शेख शुक्रवारी सकाळी दहा वाजता कामाला गेले होते. त्यानंतर दुपारी ते 1 वाजता घरी आले. बाहेरून घरी आल्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने गरम पाणी ठेवले होते. त्यानंतर शिद्राची आई बाथरूममध्ये गेली. तेव्हा गॅसजवळ हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या मुलीच्या अंगावर खेळता खेळता गरम पाणी सांडले. मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तात्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. ही घटना 7 जुलै रोजी घडली होती. त्यानंतर तिच्यावर 4 दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र 11 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. यामुळे पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.





