तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा दुर्दैवी मृत्यू; धुळ्यामधील घटना

धुळे : धुळ्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये तापी नदीमध्ये बहिण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या तरुण मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
काय घडले नेमके?
सर्वपित्री अमावस्यानिमित्त गावा जवळच असलेल्या तापी नदी पात्रात दोघे भाऊ बहिणी हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते. या नदीपात्राजवळ उत्कर्ष रमेश पाटील (वय 13) राहणार सोनेवाडी याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्यावेली, त्याला वाचवण्यासाठी त्याचीच बहीण वैष्णवी सुरेश पाटील हिने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून सदर ठिकाणी वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना अपयश आले. त्यांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.





