Unemployment: देशातील १५ वर्षांवरील व्यक्तींचा बेरोजगारी दर एप्रिल २०२६ मध्ये ५.२ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक असल्याची माहिती केंद्र सरकारच्या नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणातून (PLFS) समोर आली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्येही बेरोजगारी दर ५.२ टक्के नोंदविण्यात आला होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या एप्रिल २०२६ च्या अहवालानुसार, मार्च २०२६ आणि एप्रिल २०२५ मध्येही बेरोजगारी दर ५.१ टक्के होता. शहरी भागातील बेरोजगारी दर मार्चमधील ६.८ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ६.६ टक्क्यांवर आला असला, तरी ग्रामीण भागात तो ४.३ टक्क्यांवरून ४.६ टक्क्यांपर्यंत वाढला. पुरुषांमधील बेरोजगारी दर एप्रिलमध्ये ५.१ टक्के राहिला, तर महिलांमध्ये तो ५.४ टक्के नोंदविण्यात आला. शहरी महिलांचा बेरोजगारी दर ९ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांपर्यंत घसरला असून, एप्रिल २०२५ नंतरचा हा सर्वात कमी स्तर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कामगार सहभाग दर (LFPR) एप्रिलमध्ये ५५ टक्के राहिला असून, मार्चमध्ये तो ५५.४ टक्के होता. ग्रामीण भागात हा दर ५७.५ टक्के, तर शहरी भागात ५०.१ टक्के नोंदविण्यात आला. महिलांचा कामगार सहभाग दर ३३.९ टक्क्यांवर आला असून, मार्चमध्ये तो ३४.४ टक्के होता. कामगार-लोकसंख्या प्रमाण (WPR) एप्रिलमध्ये ५२.२ टक्के राहिले. मार्चमध्ये हे प्रमाण ५२.६ टक्के, तर एप्रिल २०२५ मध्ये ५२.८ टक्के होते. देशभरातील ३.७४ लाखांहून अधिक व्यक्तींच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे. बेरोजगारी दर ५.२ टक्क्यांवर पोहोचला म्हणजे नक्की काय? ५.२ टक्के बेरोजगारी दर म्हणजे काम करण्यास इच्छुक आणि काम शोधणाऱ्या प्रत्येक १०० लोकांपैकी सुमारे ५ जणांना नोकरी मिळालेली नाही, असा त्याचा साधा अर्थ होतो. उदाहरणार्थ : समजा, एखाद्या गावात किंवा शहरात १०० लोक काम करण्यासाठी तयार आहेत आणि नोकरी शोधत आहेत. त्यापैकी ९५ लोकांकडे काम आहे, तर ५ लोक बेरोजगार आहेत. अशा वेळी बेरोजगारी दर ५ टक्के मानला जातो. आता देशात एप्रिल २०२६ मध्ये हा दर ५.२ टक्के झाला म्हणजे, प्रत्येक १०० काम शोधणाऱ्या लोकांपैकी अंदाजे ५ ते ६ लोकांना रोजगार मिळालेला नाही. यात विद्यार्थी, गृहिणी किंवा काम करण्याची इच्छा नसलेले लोक धरले जात नाहीत. फक्त काम शोधत असलेल्या आणि काम करण्यास उपलब्ध असलेल्या लोकांचाच विचार केला जातो.